कोल्हापूर- शिवस्मारकावरून अनेकदा वाद झाले आहेत. आता मात्र सरदार पटेलांच्या पुतळ्या पेक्षा शिवस्मारकाची उंची कमी असावी असा मोदींचा आग्रह आहे. आणि तो तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळेच त्यांनी शिवस्मारकाची उंची कमी केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाची उंची कमी केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वश्रेष्ठ राजे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं भव्य मंदिर बांधण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्न केला, असंही ते म्हणाले.
सरदार पटेलांबाबत आम्हाला आदर आहे. मात्र हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरावा यासाठी शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता परत आली तर जगात भव्य ठरेल असं शिवस्मारकं बांधण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.